Ad will apear here
Next
श्रावणात घननिळा बरसला...
..

दर वर्षी श्रावण येतो... प्रत्येक वेळी तो नवा वाटतो... ‘श्रावणात घन निळा बरसला’ या मंगेश पाडगावकरांच्या निसर्गप्रतिमांनी नटलेल्या कवितेसारखा, लतादीदींच्या निर्मळ स्वरांसारखा आणि खळेअण्णांनी बांधलेल्या, वरवर पाहता सोप्या, पण गाताना अवघड असलेल्या चालीसारखा... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या याच कवितेबद्दल...
.....
उन्हाचे चटके मुकाट्यानं सोसत झाडं उभी असतात, उजाड माळावरची रखरख, दूरवरचे डोंगर उदास आणि अवतीभवतीचा परिसरही कसा भकास दिसतो. प्रतीक्षेचा एक एक क्षण जाता जात नाही आणि मग एक दिवस पावसाचा सांगावा घेऊन वारा येतो. निरभ्र आकाशात हळूहळू काळे ढग जमायला लागतात. बघता बघता आभाळात इतकी दाटी होते, की काही क्षणांतच पर्जन्यधारा बरसू लागतात. मृद्गंधाचा दरवळ सर्वदूर पसरतो. अवघं चराचर आनंदानं फुलून येतं... ही किमया असते पावसाची... वर्षा ऋतूची... 

शेतकरी या पावसाच्या पाण्याला ‘देवाचं पाणी’ म्हणतात. ‘देवाचं पाणी’ याचा अर्थ उमगायला मला बरीच वर्षे लागली. उन्हाची झळ ज्यांनी सोसली नाही त्यांना कधीच कळणार नाही ‘देवाच्या पाण्याचं’ गुपित! पावसाचा प्रत्येक थेंब अवघ्या सृष्टीला चैतन्य बहाल करतो. हिरव्या पोपटी पानांची लवलव अंगावर मिरवत रुणझुणत्या पावलांनी श्रावण येतो... मंगेश पाडगावकरांची कविता गात गात येतो... ! त्याच्या सोबतीला असतात लतादीदींचे सूर... 

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा... 

हे शब्द लिहिताना माझ्याही कानामनात हे गीत वाजू लागलंय. सतारीनं केलेली रिमझिम स्वरांची बरसात...सतारीच्या मागून आलेली बासरी...आणि मग लतादीदींच्या सुरेल गळ्यातून हळुवार उलगडत गेलेला कवीच्या शब्दांचा सुंदर मोरपिसारा... साक्षात श्रावणालाही रोमांचित करणारा...

कसं सुचलं असेल हे गीत कविवर्यांना? श्रावणाचं सौंदर्य अनुभवताना सुचलं असेल का? रिमझिमणाऱ्या सरी अंगावर झेलताना सुचलं असेल का? ऊनपावसाचा खेळ अनुभवताना, इंद्रधनूची कमान पाहताना सुचलं असेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका कार्यक्रमात खुद्द मंगेश पाडगावकरांनीच दिली आणि सारे जण थक्क होऊन ऐकतच राहिले. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ याची प्रचिती आली. समोर जे नाहीच ते साकार करण्याची किमया कवीच्या प्रतिभेत असते हे सत्य जाणायचं असेल, तर तो किस्सा सांगायलाच हवा... किस्सा नको म्हणायला, कहाणी म्हणू या... वर्षानुवर्षे श्रावणात नाही का आपण कहाण्या वाचतो, ऐकतो... सगळ्या माहीत असतात, तरीही भक्तिभावानं आधुनिक काळाची सांगड घालून, नवनवे अर्थ शोधत आपण वाचतोच ना... तशीच या गाण्याची कहाणी सांगावीशी वाटते, बऱ्याच जणांना माहिती असली तरीही... तर या श्रावणगीताची कहाणी अशी... 

..

विख्यात संगीतकार श्रीनिवास खळे आणि कविवर्य मंगेश पाडगावकर.. दोघेही मुंबई आकाशवाणीत कार्यरत होते. कल्पना करा, अशी प्रतिभावंत मंडळी आकाशवाणीत काम करत होती, त्या वेळी रसिकांबरोबर आकाशवाणीची वास्तूही पुलकित होत असणार... शब्द-स्वरांनी रसिकांच्या ओंजळी ओतप्रोत भरत असणार... त्या क्षणांचे साक्षीदार खरोखर भाग्यवान... तर मी सांगत होते कहाणी शब्द-सुरांची... मुंबई आकाशवाणीत जाण्यासाठी खळेअण्णा निघत चेंबूरहून आणि पुढे त्याच गाडीत पाडगावकर सायनला चढायचे... व्हीटी स्टेशन येईपर्यंत मस्त गप्पा व्हायच्या इकडच्या तिकडच्या अर्थात कवितेच्या आणि संगीताच्या...
असाच मे महिन्यातला दिवस! घामाच्या धारांनी बेजार झालेले कवी मंगेश पाडगावकर, गर्दीनं फुललेले प्लॅटफॉर्म्स आणि लोकलचे डबे... एका डब्यात ही गीतकार-संगीतकाराची जोडी... आपल्याला वाटतं की म्हणाले असतील ‘काय वैताग आहे, किती ही गर्दी... कसला हा उकाडा!!’ हातातल्या पेपरानं वारा घेत हाश्शऽहुश्शऽ करत प्रवास करत असतील ते; पण छे! असं काहीच घडलं नाही... उलट घामाच्या धारा कविवर्यांना पाऊसधारा वाटू लागल्या. त्यांनी खिशातून एक चिटोरं बाहेर काढलं, पेन हातात घेतलं, कवितेच्या ओळी लिहिल्या... आणि ते चिटोरं खळेअण्णांच्या हातात दिलं... खळेअण्णांनी न वाचताच पुन्हा पाडगावकरांना दिलं, म्हणाले ‘वाचून दाखवा तुम्हीच.’ पाडगावकरांनी कविता वाचून दाखवली त्यांच्या खास शैलीत... बघा, तुमच्याही कानात येतोय ना मंगेश पाडगावकरांचा आवाज... त्यांचं काव्यवाचन ऐकलं नाही असा एक तरी मराठी माणूस सापडेल का हो? 

तर... असं होतं हो, कहाणी सांगता सांगता असं भरकटायला होतं. मी काय सांगत होते? हं, पाडगावकरांनी कविता वाचून दाखवली... एकदा, दोनदा, तीनदा... खळेअण्णांची सवयच होती ती...कवीच्या तोंडून कविता पुन्हा पुन्हा ऐकायची. ऐकता ऐकताच शब्दांना सुरांमध्ये गुंफण्याचं काम सुरू झालं... ऐन मे महिन्यातली उन्हाची रखरख, रेल्वेगाडीची खडखड... आणि प्रवाशांचा गोंगाट...व्हीटी स्टेशन आलं... उतरताना खळेअण्णांनी पाडगावकरांना सांगितलं, ‘झाला, तुमच्या गाण्याचा मुखडा तयार झाला.’ आणि ऐन उन्हाळ्यात या सुंदर श्रावणगीताचा जन्म झाला... ग्रीष्मात श्रावणाची वाट पाहावी... सखा श्रावण यावा... जणू राधेला कृष्ण भेटावा...

जागून ज्याची वाट पहावी ते सुख आले दारी
जिथे जिथे राधेला भेटे आता श्याममुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा...

बाहेर काय चाललंय यापेक्षा कवीच्या अंतरंगात काय चाललंय हे समजून घ्यायचं असेल, तर कवीशी झालेला संवाद, गप्पा आणि कहाणी वाचायलाच हवी नाही का? पाडगावकर खळेअण्णांबद्दल म्हणाले होते, ‘माझीच कविता मला नीट कळते, खळ्यांमुळे.’
 
रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
श्रावणात घन निळा बरसला... 

श्रावणातल्या रंगात न्हालेलं रान आणि या रानात हरवलेले पक्षी, पाण्यावरची थेंबबावरी नक्षी आणि गतजन्मीची ओळख सांगणारा वारा... आपल्या स्वरसाजातून खळेअण्णांनी आपल्याला भेटवला तो या गाण्यातून आणि पाचूच्या हिरव्या माहेरी आलेलं हळदीचं पिवळंधम्मक ऊन मंगेश पाडगावकरांनी आपल्याला दाखवलं त्यांच्या काव्यप्रतिभेतून! ‘पाचूचं माहेर’ या माझ्या ललित लेखांच्या पुस्तकाचं शीर्षक यावरूनच सुचलं होतं. आणि माझं भाग्य असं, की या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात मंगेश पाडगावकरांच्या हस्ते झालं होतं. 

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
श्रावणात घन निळा बरसला... 

‘भाळावरच्या थेंबाचं फुलपाखरू’, ‘मातीच्या गंधानं भरलेला गगनाचा गाभारा’ किती सुंदर प्रतिमा वापरतात पाडगावकर! रस, रंग, रूप आणि स्पर्श एकाच वेळी अनुभवायला देणाऱ्या पाडगावकरांच्या प्रतिमा हे त्यांच्या कवितेचं खास वैशिष्ट्य. 

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला... 

व्वा! किती वेळा ऐकायचं हे गाणं! अनाहत नादानं भारलेलं... लतादीदींच्या दैवी आवाजातून अंतर्यामीचे सूर छेडणारं... बासरी आणि सतारीच्या स्वरांच्या अलगद प्रवाहाबरोबर संवेदनशील मनाला दूरवर घेऊन जाणारं... आपल्या धकाधकीच्या आयुष्यात, अंतर्बाह्य वास्तवाच्या उन्हाळ्याचे चटके सोसताना हे गीत जेव्हा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेव्हा रिमझिमणाऱ्या श्रावणधारा आपणही अनुभवतोच ना? ही किमया आहे कवी, संगीतकार आणि गायक कलाकाराची... 

दर वर्षी श्रावण येतो... प्रत्येक वेळी तो नवा वाटतो... मंगेश पाडगावकरांच्या निसर्गप्रतिमांनी नटलेल्या या कवितेसारखा, लतादीदींच्या निर्मळ स्वरांसारखा आणि खळेअण्णांनी बांधलेल्या, वरवर पाहता सोप्या, पण गाताना अवघड असलेल्या चालीसारखा... बघा तुम्हीही गुणगुणायला लागलात ना? 

श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीमधारा...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदरातील लेखांचे पुस्तक आणि ई-बुक प्रसिद्ध करण्यात आले असून, ते बुकगंगा डॉट कॉमवर उपलब्ध आहे.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZZPBF
 खिडकीबाहेर उनपावसाचा लपंडाव चालू आहे आणि मी तुमच्याबरोबर शब्दरसध्वनीच्या
अद्भुत गारुडांत तुडुंबचिंब भिजलो तो तुमच्या
रसग्रहणामुळे!इथे धन्यवाद तोकडे पडतात!1
 प्रतिमाताई अभिनंदन.अतिशय सुंदर शब्दात लिहिलंय कवितेवर.अशा कवितेवर लिहिणं खरं तर आव्हान असतं. आपण पेललंय छान.
Similar Posts
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
फिरुनी नवी जन्मेन मी... वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आठ सप्टेंबर हा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही सुधीर मोघे यांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंच्या स्वरांनी सजलेली कविता ...
मी गाताना गीत तुला लडिवाळा... वास्तवतेचे चटके सोसूनही मन निबर होऊ न देता संवेदनशीलता ज्यांनी जपली त्या कविवर्य ना. धों. महानोरांचा १६ सप्टेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील त्यांच्या ‘मी गाताना गीत तुला लडिवाळा’ या अंगाईबद्दल...
ही वाट दूर जाते... कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन नुकताच (१२ ऑक्टोबर) होऊन गेला. तसेच ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिन २६ ऑक्टोबर रोजी आहे. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या शांताबाईंनी लिहिलेली आणि हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेली ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language